मिरज जंक्शनहून हरिद्वार–ऋषिकेश व अजमेरसाठी साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या कायमस्वरूपी

0
WhatsApp Image 2026-03-21 at 3.19.59 PM

मिरज (प्रतिनिधी)
मिरज जंक्शन येथून धावणाऱ्या हरिद्वार–ऋषिकेश आणि अजमेर मार्गावरील साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस गाड्यांना आता कायमस्वरूपी एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर व परवडणारी सेवा उपलब्ध होणार आहे. गाडी क्रमांक 07363/64 हुबळी–योगनगरी ऋषिकेश साप्ताहिक स्पेशल ही गाडी आता कायमस्वरूपी गाडी क्रमांक 17363/64 हुबळी–योगनगरी ऋषिकेश (हरिद्वार) साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. ही गाडी दर सोमवारी पहाटे 3.10 वाजता मिरज स्थानकातून सुटेल, तर परतीच्या प्रवासात शनिवारी रात्री 12.45 वाजता मिरज येथे आगमन करेल.

तसेच, गाडी क्रमांक 06281/82 मैसूर–अजमेर स्पेशल एक्सप्रेसलाही कायमस्वरूपी गाडी क्रमांक 16281/82 मैसूर–अजमेर साप्ताहिक एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. ही गाडी मिरज येथून शनिवारी पहाटे 2.45 वाजता सुटून सोमवारी पहाटे 4.35 वाजता अजमेर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात अजमेरहून सोमवारी सायंकाळी 6.50 वाजता सुटून बुधवारी पहाटे 1.35 वाजता मिरज येथे येईल. या दोन्ही गाड्या यापूर्वी साप्ताहिक स्पेशल म्हणून धावत होत्या. स्पेशल गाड्यांचा दर्जा असल्यामुळे तिकीटदर तुलनेने जास्त होते. त्यामुळे या गाड्यांना नियमित साप्ताहिक एक्सप्रेसचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागामार्फत रेल्वे बोर्डाचे निर्देश मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

हुबळी–योगनगरी ऋषिकेश गाडीमुळे मिरज परिसरातील भाविकांना आग्रा, मथुरा, दिल्ली, मेरठ, हरिद्वार व ऋषिकेश येथे जाणे अधिक सोयीचे होणार आहे. या गाडीला धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे, दौंड, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, झाशी, ग्वालियर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुजफ्फरनगर, हरिद्वार आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. तसेच, मैसूर–अजमेर एक्सप्रेसला हुबळी, बेळगाव, मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, चित्तोडगड, भीलवाडा आदी स्थानकांवर थांबे असणार आहेत.

दरम्यान, या गाड्यांसाठी मिरज जंक्शन येथे आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून प्रवाशांनी मिरज येथूनच तिकीट काढून बोर्डिंग पॉईंट मिरज देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात आणखी गाड्यांची सुविधा मिळण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे तथा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *