मिरजेत महापालिका शाळा क्र.१ मध्ये पुस्तकांची गुढी उभारण्याचा अभिनव उपक्रम

0

मिरज (प्रतिनिधी)
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिरज येथील महापालिका शाळा क्र. १ मध्ये यंदा परंपरेला नाविन्यपूर्ण विचारांची जोड देत ‘पुस्तकांची गुढी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. “गुढी पुस्तकांची – गुढी विचारांची” या संकल्पनेतून शिक्षक संतोष यादव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम साकारण्यात आला. विद्यार्थ्यांनी “आजची गुढी – आजची पिढी, गुढी समानतेची, समतेची” असा संदेश देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी विद्यार्थिनींनी विविध सामाजिक विषयांवर आधारित आकर्षक गुढ्या उभारल्या. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रभक्ती व एकात्मता, अस्पृश्यता निर्मूलन तसेच सर्जनशीलता व ज्ञान या विषयांचा समावेश होता. या माध्यमातून समाजप्रबोधनाचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ‘गुढी पाडवा – पट वाढवा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये सहा नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेतून गणपती मंदिरापर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. “झाडे लावा, लेक वाचवा, प्लास्टिक हटवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सविता पवार, शिक्षिका महानंदा राजमाने, विभूते मॅडम, संतोष यादव तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. “गुढी ही केवळ सणाची नसून विचारांची असावी” हा संदेश देत महापालिका शाळा क्र. १ ने शिक्षण क्षेत्रात एक वेगळी आणि प्रेरणादायी दिशा दाखवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *