सरूड येथे समता परिषद; जातीव्यवस्था अंतासाठी एकजुटीचे आवाहन
समता परिषदेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर
सरूड, (प्रतिनिधी) – तालुका शाहूवाडी येथील सरूडमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त आयोजित समता परिषदेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी जातीव्यवस्था संपवण्यासाठी सर्व समतावादी शक्तींनी एकत्र येऊन संघर्ष उभारण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत त्यांच्या सर्वच अपेक्षित विचारांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे समतेच्या अपूर्ण मुद्द्यांवर आधारित चळवळी अधिक बळकट करण्याची गरज आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक हेमंत तेलवेकर यांनी केले, तर परिषदेसंबंधी भूमिका प्रा. प्रकाश नाईक यांनी मांडली. यावेळी प्रा. सुकुमार कांबळे (डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष) यांनी महाड सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होऊनही खरी समता प्रस्थापित झालेली नसल्याचे सांगितले. विषमतेच्या मूळ स्रोतांविरोधात लढा उभारण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
मा.आ. बाबासाहेब पाटील सरूडकर यांनी दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व बहुजन समाजाच्या ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. विषमतेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या व्यवस्थेविरोधात एकत्रित लढा उभारल्याशिवाय परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले.
परिषदेत सर्व महामानवांच्या विचारांवर आधारित संघर्ष अधिक तीव्र करण्याचा, लोकशाहीची मोडतोड करून भेद निर्माण करणाऱ्या विकृत राजकारणाचा निषेध करण्याचा आणि जातीव्यवस्था अंतासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
यावेळी मैथिली कांबळे, भाई भारत पाटील, लालासाहेब नाईक, अनिरुद्ध कांबळे, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सुरेश म्हाऊटकर, मुकुंद पाटील, सरपंच भगवान नांगरे, हनुमंतराव कवळे, विश्वासराव सरुडकर, सचिन काळे, संदीप कांबळे, रामभाऊ परळीकर, पं.स. सदस्य सुरेश पवार, सुषमा पाटील, दीपाली घोलप, अशोक गायकवाड, रामदास व्हावळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज गायकवाड यांनी केले, तर आभार राजाभाऊ मगदूम यांनी मानले.
00000


