मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती जगण्याची संस्कृती – प्रशांत जगताप

0
WhatsApp Image 2026-05-06 at 8.25.22 PM

मिरज (प्रतिनिधी)
येथील माजी सैनिक सोसायटी परिसरात सुरू असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू व्याख्यानमालेच्या २४ व्या वर्षातील दुसरे पुष्प बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘अभिजात मराठी : मनातली, माणसातली आणि जगातली’ या विषयावर महाराष्ट्र शासनाचे वित्त लेखाधिकारी प्रशांत नारायण जगताप यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान देत मराठी भाषेच्या अभिजात परंपरेचा आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचा वेध घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किशोरी अशोक पाटील या होत्या. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच व्याख्यानमालेचे संस्थापक कै. प्रा. पै. अशोक पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रशांत जगताप म्हणाले, “मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. मनातील संवेदना, माणसातील जिव्हाळा आणि जगातील आपली वेगळी ओळख मराठीमुळेच जपली जाते. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असला, तरी त्याने आपल्या भाषेचे संस्कार आणि संस्कृतीची नाळ कायम जिवंत ठेवली आहे.” त्यांनी मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास, तिचे साहित्यिक वैभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील वाढते महत्त्व यावर सविस्तर भाष्य केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विनायक यादव यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षीय समारोपात श्रीमती किशोरी पाटील यांनी व्याख्यानमालेसारख्या उपक्रमातून समाजप्रबोधनाची परंपरा अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद पाटील यांनी मानले. माजी सैनिक सोसायटी, सह्याद्रीनगर, वसंतनगर, साई कॉलनी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अशोकभाऊ पाटील कोकळेकर व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *