मिरजेत घरफोडी करून पसार ३ चोरटे २४ तासाच्या आत जेरबंद ; गांधी चौक पोलिसांची कारवाई
मिरज (प्रतिनिधी)
येथील कृष्णा घाट रोडवर घरफोडी करून ५५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी कौशल्यपूर्णरित्या तपास करीत २४ तासाच्या आत संशयीतांना अटक केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, शंकर गायकवाड, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोसिन टीनमेकर, राजेंद्र हारगे, रामकृष्ण सुरवसे यांनी कारवाई केली. किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (भाटी) (मूळ रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), ऋतुराज सुभाष गजगेश्वर (रा. हरिपूर रोड, सांगली), समर्थ शंकर डवरी (रा. हरिपूर रोड सांगली) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिरजेत कृष्णा घाट रोडवर कुदरत कादर मुलाणी यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी जावेद शेख यांना किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार याच्याबद्दल माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस पथकाने कारवाई करत वरील तीनही आरोपींना ताब्यात घेतले. किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (रा. शांती प्रकाश नगर झोपडपट्टी, गडमुडशिंगी, जि. कोल्हापूर) याच्या विरोधात महाराष्ट्र सांगली, कोल्हापूर, सातारा व कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये मालमत्तेविरुद्धचे २७ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याने कोल्हापूर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्यास दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तेथून हद्दपार केल्यानंतर तो सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह त्यास जेरबंद केले.


