‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या विशेष शो निमित्त रितेश व जेनिलिया शनिवारी सांगलीत
सांगली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगलीमध्ये चित्रपटाचे विशेष शो आयोजित करण्यात आले असून यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख हे शनिवारी सांगली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती नितीन चौगुले यांनी दिली.
शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थ, मारुती चौक येथे रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. यावेळी रितेश देशमुख सांगलीकरांशी संवादही साधणार आहेत. यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व शिवभक्तांनी भगवी टोपी किंवा फेटा परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


