शैक्षणिक जीवनातील निर्लेप मैत्र ही आयुष्याची खरी शिदोरी – प्राचार्य डॉ. अनिल पाटील

0
WhatsApp Image 2026-05-08 at 11.49.11 AM

मिरज (प्रतिनिधी)
शैक्षणिक जीवनात जुळलेले निर्लेप मैत्र हे आयुष्यभर साथ देणारे असते. त्या मैत्रीची उब आणि आठवणी कधीही संपत नाहीत, असे प्रतिपादन बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. ते १९८५ च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले, “मैत्रीत कोणताही स्वार्थ नसतो. महाविद्यालयीन जीवनातील आठवणी पुढील आयुष्याचा मार्ग उजळून टाकतात. मातृ-पितृ आणि गुरूंचे ऋण मानणारी माणसेच खऱ्या अर्थाने महान आणि वंदनीय असतात.” या मेळाव्यास तत्कालीन प्राध्यापक महाडिक सर, प्रा. बिसले सर, प्रा. युसूफ मुलाणी सर, प्रा. देसाई सर, प्रा. पट्टणशेट्टी सर तसेच प्रा. बापूसाहेब चव्हाण उपस्थित होते. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भिमराव धुळूबुळू हे सन्माननीय निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करत आपल्या कविता सादर केल्या.

या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्राचार्य, पोलीस अधिकारी, वकील, माध्यमिक शिक्षक आणि उद्योजक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करत यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास उलगडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य सदाशिव भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मिरज पंचायत समितीच्या सभापती श्रीमती माणिकताई माळी यांनी संयोजक म्हणून मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. लालासाहेब घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वाघमोडे नर्सरीचे संचालक राम वाघमोडे, आप्पासाहेब धुळूबुळू, दत्तात्रय शिंगाणा, तुकाराम बंडगर आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *