मिरजेत शाहू व्याख्यानमालेत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा जागर
मिरज (प्रतिनिधी)
येथील माजी सैनिक सोसायटी परिसरात सुरू असलेल्या २४ व्या ‘राजर्षी छत्रपती शाहू व्याख्यानमाले’चे तिसरे पुष्प ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा साम्राज्य’ या विषयावर सुप्रसिद्ध युवा व्याख्याते अभिजीत कोळी यांनी प्रभावीपणे गुंफले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच व्याख्यानमालेचे संस्थापक कै. प्रा. पै. अशोक पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनाही अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते अभिजीत कोळी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, स्वराज्याची संकल्पना आणि मराठा साम्राज्याने देशाच्या इतिहासात दिलेले योगदान यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. महाराजांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा श्रीमंत कोळेकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्याख्यानमालेच्या कार्याचे कौतुक केले.
प्रास्ताविक प्रा. भारत अशोक पाटील यांनी केले. त्यांनी व्याख्यानमालेची २४ वर्षांची परंपरा आणि त्यामागील भूमिका स्पष्ट केली. व्याख्यात्यांची ओळख उत्तम लोंढे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. भारत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोकभाऊ पाटील कोकळेकर यांनी मानले. यावेळी माजी सैनिक सोसायटी, सह्याद्रीनगर आणि परिसरातील व्याख्यानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


