शिक्षण हा व्यवसाय नव्हे, तर ज्ञान देणारे शिक्षण मंदिर म्हणून आम्ही संस्था चालवतो : आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे

0
WhatsApp Image 2026-05-11 at 5.51.20 PM

मिरजेतील एमटीडीके स्कूलचा दहावीचा सलग 7 वर्ष तर बारावीचा सलग 4 वर्ष शंभर टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मिरज (प्रतिनिधी)
“शिक्षण हा व्यवसाय नसून समाज घडविणारे पवित्र शिक्षण मंदिर आहे. गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून कार्य सुरू आहे,” असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केले.

मिरजेतील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूल तसेच मालगाव येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूलमधील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सौ. सुमनताई खाडे, सभापती बानू मुसा जमादार, नगरसेविका उज्वला कांबळे, नगरसेविका प्राजक्ता धोतरे, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक प्रशांत पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर, मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरजेतील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीचा सलग सातवे वर्ष तर बारावीचा सलग चौथे वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेत प्री-प्रायमरी ते बारावीपर्यंत ३९ वर्ग असून मिरज आणि मालगाव येथील शाखांमध्ये सुमारे १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, लायब्ररी, प्रशस्त क्रीडांगण, रोबोटिक्स लॅब, एनसीसी, मल्टीस्कील कोर्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संस्कार वर्ग तसेच दररोज विविध उपक्रम राबविले जातात.

शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असून विद्यालयाच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दहावी इंग्रजी माध्यमात अनुष्का कदम हिने ९५.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. अजिंक्य बनकर (९५ टक्के) द्वितीय, आश्लेषा चौगुले (९३.६० टक्के) व वैष्णवी होनमोरे (९३.६० टक्के) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर मराठी माध्यमात श्लोक पाटील याने ९७.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. गोविंद खोत (८२.४० टक्के) द्वितीय तर संस्कार चव्हाण (७१.२० टक्के) तृतीय आला.

बारावी वाणिज्य शाखेत सिद्धी यादव हिने ९४.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश्वरी साळुंखे (९२.९३ टक्के) द्वितीय तर जुनेरिया शेख (८५.६७ टक्के) तृतीय आली. विज्ञान शाखेत पूर्वा पाटील हिने ८१.६७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी पवार (६४ टक्के) द्वितीय तर सयूज मोहिते (६२.३३ टक्के) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *