सांगलीत जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात ; समवेदना मेडिकल फाउंडेशनसह विविध संस्थांचा पुढाकार

0
WhatsApp Image 2026-05-09 at 6.54.39 PM

जनजागृती रॅली, मोफत तपासणी यासह राबवण्यात आले विविध उपक्रम
सांगली (प्रतिनिधी)
जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ८ मे रोजी समवेदना मेडिकल फाउंडेशन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, सांगली सिव्हील रुग्णालय, NH हॉस्पिटल बेंगलोर, DKMS फाउंडेशन बेंगलोर आणि सांगली जिल्हा ब्लड बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती व आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

“निदान न झालेल्यांना शोधणे व दुर्लक्षित घटकांना आधार देणे” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची सुरुवात सांगली सिव्हील रुग्णालयातून जनजागृती रॅलीने झाली. “थॅलेसेमिया आवरा”, “रक्तदान हेच जीवनदान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीस अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सिव्हिल सर्जन डॉ. विक्रमसिंह कदम, समवेदना फाउंडेशनचे संस्थापक बरकत पन्हाळकर, NH हॉस्पिटलचे विकी रॉय, मोहम्मद रिजवान यांच्यासह विविध ब्लड बँक, नर्सिंग विद्यार्थी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यानंतर मिरज मेडिकल कॉलेजच्या कुलकर्णी हॉलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम झाला. डॉ. दीपा फिरके, डॉ. हरीश तांबेकर, अमीन भोकरे तसेच बरकत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. डॉ. प्रियांका पाटील यांनी थॅलेसेमिया जनजागृती व रुग्णसेवेविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. सुरभी पठ्ठणशेट्टी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्रुती यागलेवाड यांनी केले. या कार्यक्रमास ८८ थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते. मोफत तपासणी, HLA टेस्ट, समुपदेशन, औषध वितरण तसेच Cardiac MRI साठी अपॉइंटमेंट देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शबनम जमादार, रोहिणी राजदीप, समीर कांबळे, प्रेरणा नांगरे, सलीम मुल्ला, राजू कांबळे, विकास माने, सूर्यप्रकाश राऊत व खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

थॅलेसेमिया डे केअर सेंटरला विलंब; रुग्णांचे हाल कायम
सांगली व मिरज सिव्हील येथे अद्यावत थॅलेसेमिया डे केअर सेंटर सुरू होण्यास विलंब होत असल्याने रुग्णांना विविध उपचारांसाठी वेगवेगळ्या विभागांत फिरावे लागत आहे. एकाच छताखाली उपचार सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांचे जीवनमान व जीवनमर्यादा वाढण्यास मदत होणार असून आरोग्य प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *