सैनिक परिवारासाठी हास्य सेवेचा वृषभ आकिवाटे यांचा अनोखा उपक्रम
सांगली (प्रतिनिधी)
“जगण्यासाठी हसणे अत्यंत आवश्यक असून, हसण्यामुळे आयुष्य समृद्ध आणि आनंदी होते,” असे प्रतिपादन झी मराठीवरील लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील हास्यकलाकार वृषभ आकिवाटे यांनी केले. सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथील सैनिक मुलांच्या वसतिगृहात जागतिक हास्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी आकिवाटे यांनी विनामोबदला हास्यसेवेचा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अरविंद तांबवेकर, उद्योजक रमाकांत घोडके, प्रा. पी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात वृषभ आकिवाटे यांनी दैनंदिन जीवनातील प्रसंग, विविध सवयी, नेते-अभिनेत्यांची मिमिक्री तसेच नवरा-बायकोवरील विनोदी प्रसंग सादर करत उपस्थितांना खळखळून हसवले. प्रेक्षकांनीही त्यांच्या हास्यविनोदाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विभागाचे अधिकारी अनुरथ वाकडे, अधीक्षक गजानन जाधव, दिलीप कदम तसेच राजेंद्र कोठावळे, श्रीकांत पाटील, सागर पाटील यांच्यासह माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


