जखमींवर उपचारात हयगय नको ; मोटेवाडीतील जखमींची खा. विशाल पाटील यांनी घेतली भेट

0
1001606010

मिरज (प्रतिनिधी)
मोटेवाडी (ता. जत) येथील मरगुबाई मंदिराच्या शेडची भिंत कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. त्यातील जखमींच्या उपचारात अजिबात हयगय करू नका, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी डॉक्टरांना दिल्या.

मिरज येथील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची त्यांनी भेट घेतली. विचारपूस केली. नातेवाईकांना काही हवे-नको याबाबत विचारणा केली. मिरज सिव्हिलचे डॉ. रुपेश शिंदे, प्राणी हॉस्पीटलचे डॉ. किरण प्राणी, सिनर्जी हॉस्पिटलचे डॉ. सचिन होनमोरे यांच्याशी खासदार पाटील यांनी चर्चा केली. कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे उपस्थित होते.

मरगुबाई देवीच्या मंदिरात दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत त्यांनी रुग्णांकडे विचारणा केली. रुग्णांनी आपबिती सांगितली. वादळी वाऱ्याने कशा पद्धतीने शेड उचलले आणि त्यानंतर भित कशी पडली, याबाबत माहिती देताना रुग्णांचे डोळे पाणावले होते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सहा भाविकांना खासदार पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, असे आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *