शित्तूर – वारुण ला कायमस्वरूपी वायरमन कधी ?
जशी वीजबिलाची वसुली तत्परतेने करता तशी खंडित वीज सुरळीत करावी. ग्रामस्थानचा आक्रोश
शित्तूर-वारुण (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण गावाला महावितरण कडून कायमस्वरूपी निवासी वायरमन मिळावा अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. कारण वारंवार खंडित विजेमुळे गावाला ४ते ५ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. लाईट येण्यासाठी सात-आठ तास वाट पाहावी लागते. कधी रात्र अंधारात काढावी लागते. अभयारण्यांशेजारी गाव असल्यामुळे रात्री मोकाट फिरणाऱ्या हिंस्त्र वन्य प्राण्यापासून गावक-यांना फार मोठा धोका निर्माण झाला आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यास दुसऱ्या दिवसाची नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास लहान मुले, वयोवृद्ध स्त्री पुरुष, आणि एकंदरीत सर्वांनाच तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाल्यास त्याचा परिणाम पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. परिणामी शित्तूर-वारुण ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
उन्हाळी सुट्टीसाठी शहरातून गावाकडे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आल्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी खंडित वीजपुरवड्यामुळे पाण्याच्या टाकीत मुबलक पाणीसाठा होऊ शकत नसल्याने गावाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यात फार मोठी अडचण येत असल्याचे ग्रामपंचायत शित्तूर – वारुण च्या नळ पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शित्तूर-वारुण आणि वाड्या वस्त्या मिळून सुमारे १२०० ते १४०० च्या आसपास महावितरणच्या विजेचा लाभ घेणारे ग्राहक आहेत. प्रत्येक महिन्याकाठी पास साडेपाच ते सहा लाख रुपये विज बिल सदरच्या ग्राहकांकडून महावितरण आकारते. ग्रामीण भाग असल्यामुळे इथला बहुतांश ग्राहक हा शेती मोलमजुरी करून इमाने इतबारे विज बिल वेळच्या वेळी भरत असतो. असे असताना गेली अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी आणि निवासी वायरमन मिळावा या शित्तूर वासियांच्या मागणीला महावितरण कडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. लवकरात लवकर महावितरण कडून शित्तूर-वारुण साठी कायमस्वरूपी निवासी वायरमन ची नेमणूक करावी व सुरळीत विजपुरवठा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वारंवार रात्री – अपरात्री खंडित होणारा विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी लोकांना दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते, त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विजेसंबधी असणाऱ्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी गावाला कायमस्वरूपी, निवासी वायरमनची आवश्यकता आहे.
डॉ. संजय मगदूम (माजी सरपंच शित्तूर- वारुण)


