मालगाव परिसरातील अवैध धंदे बंद करा; अन्यथा गावबंद आंदोलनाचा इशारा
मिरज (प्रतिनिधी)
मालगाव व गावाच्या हद्दीत सुरू असलेले मटका, ऑनलाईन सट्टा, कॅसिनो, जुगार, गांजा विक्री तसेच अवैधरित्या सुरू असलेली दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा गावबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत मिरज शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे अनेक तरुण व्यसन व जुगाराच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून सामाजिक वातावरण बिघडत आहे. यापूर्वीही मानवाधिकार संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. तसेच ग्रामसभेतही अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक तसेच मिरज ग्रामीण पोलिस ठाणे यांनाही निवेदने देण्यात आली होती. तरीही अवैध धंदे सुरूच असल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर, माजी उपसरपंच प्रदीप सावंत, माजी सोसायटी चेअरमन रावसाहेब माने, माजी दक्षता व नियंत्रण समिती सांगली जिल्हा सदस्य विश्वास बापू खांडेकर, माजी सोसायटी चेअरमन उद्धव सावंत, अशोक हुळ्ळे, मानवाधिकार संघटनेचे महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष कुमार भंडारे, सचिव कांबळे, महावीर चव्हाण, राहुल कांबळे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


