बेलगावी.. नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर
प्रभावी लेखनशैली आणि हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव
कोल्हापूर (प्रतिनिधी): बेलगावी जिल्ह्यातील बेलंकी गावचे रहिवासी तसेच नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” प्रदान करण्यात येणार आहे. राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील बड़ी खाटू येथे अखिल भारतीय कबीर मठाच्या वतीने २९ जून रोजी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख संत श्री नानकदासजी महाराज यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. देसाई हे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा ट्रेनिंग कॉलेज, हैदराबाद (तेलंगणा) येथे हिंदी प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत. हिंदी साहित्यावरील प्रेम आणि लेखनाची जिद्द यामुळे त्यांनी नवोदित कवी म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे.
डॉ. देसाई यांचे “दस्तक… अनसुनी आहट” व “दहलीज… एक सीमा” हे दोन स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहांमध्ये देशप्रेम, समाजप्रबोधन, राजकारण, व्यंग्य, प्रेम आदी विविध विषयांवरील कविता समाविष्ट आहेत. त्यांच्या अनेक कविता वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांच्या प्रभावी लेखनशैलीचा आणि हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, याच वर्षी “रवींद्रनाथ टागोर स्वदेश इंडिया ग्लोरीज” संस्थेकडून त्यांना “स्वदेश भारत गौरव सन्मान २०२६” देखील जाहीर झाला आहे. डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांनी प्राथमिक शिक्षण बेलगावी जिल्ह्यातील छोट्याशा बेलंकी गावात घेतले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे पूर्ण केले. सध्या ते हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.
00000


