मिरजेत आंतरजिल्हा दुचाकी चोरटा गजाआड ; सात चोरीच्या दुचाकी जप्त
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेसह सांगली, चिंचणी वांगी, कराड, कोल्हापूर येथून दुचाकी चोऱ्या करणाऱ्या दुचाकी चोरट्यास जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी चोरीस गेल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. अजय बाळासो पटकारे (वय ४३, रा. विचारे मळा, शाहू कॉलेज समोर, कोल्हापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, निलेश कदम, राजेश गवळी, नितीन मोरे, झाकीर काझी, दाईंगडे, असलम पिरजादे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, मिलिंद पाटोळे यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दुचाकी चोऱ्यांबाबत तपास सुरू होता. यावेळी चोरीस गेलेली एक दुचाकी विश्वास भुसे (रा. संजय नगर) याच्याकडे असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ढालगाव येथे सेंट्रिंगच्या कामावर असलेल्या अजय पटकारे याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलीस पथक ढालगाव येथे गेले असता सदर ठिकाणावरून अजय पटकारे हा पळून गेला. तो दिनांक २२ मे रोजी पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी ६ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या दुचाकी या मिरज म्हैसाळ रोडवर ठेवल्याची माहिती पटकारे याने दिली. पोलिसांनी सदरच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. पटकरे याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी मिरज शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


