सिद्धेवाडीतील डॉ. नेताजी खोत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका खजिनदारपदी निवड
माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नायकवडींकडून सदिच्छा
मिरज (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या मिरज तालुका कार्यकारिणीची घोषणा मिरज येथे करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी तसेच मिरज तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे (मल्लेवाडी) यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथील प्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नेताजी रामचंद्र खोत यांची तालुका खजिनदारपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना डॉ. खोत यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिक कामामुळेच पक्ष व संघटना वाढीस लागते. त्याशिवाय नेतेमंडळींनाही महत्त्व प्राप्त होत नाही,” असे स्पष्ट विचार त्यांनी मांडले. डॉ. नेताजी खोत हे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सभापती स्नेहलताई मोरे, सलगर येथील नेते विजय पाटील, पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आमदार इद्रिस नायकवडी, अजितराव घोरपडे सरकार तसेच सिद्धेवाडी परिसरातील नागरिकांनी डॉ. नेताजी खोत यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


