मिरजमध्ये मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल
मिरज (प्रतिनिधी)
शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध सेवाभावी, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने भव्य कार्यकर्ता मेळावा व अभिष्टचिंतन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच रक्तदान, वृक्षारोपण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवा सप्ताहांतर्गत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत मोफत मेंदुरज्जू, रक्त व पाय तपासणी शिबिर, ऑडिओमेट्री कॅम्प, जनरल फिजिशियन व दंत तपासणी तसेच नेत्र तपासणी आदी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या शिबिरांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच ३० मे रोजी सकाळी ७ वाजता भव्य रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० वाजता पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्याच दिवशी भव्य रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.
दरम्यान, ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मिरज येथील शाही दरबार हॉलमध्ये मा. मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय सेवा सप्ताहाच्या समारोपानंतरही विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३ जून रोजी दुचाकी वाहनांची भव्य पळवणी स्पर्धा तर ११ जून रोजी पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व सामाजिक, आरोग्यविषयक व क्रीडा उपक्रमांना कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


