पुणे–मिरज दुहेरीकरणासाठी २० दिवसांचा ब्लॉक; रेल्वे प्रवाशांची गैरसोय वाढणार

0

मिरज (प्रतिनिधी)
पुणे–मिरज दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग व कार्यान्वितीकरणाच्या कामामुळे 5 जून ते 25 जून 2026 या कालावधीत विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे–मिरज मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून दररोज सुमारे चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामध्ये तीन तासांचा वाहतूक ब्लॉक आणि एक तासाचा अभियांत्रिकी ब्लॉक समाविष्ट आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः कोल्हापूर–पुणे आणि पुणे–कोल्हापूर डेमू एक्सप्रेस सेवांना या कामाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. काही गाड्या मधल्या स्थानकांपर्यंतच धावणार असून तेथूनच परतीचा प्रवास करणार आहेत. तसेच अनेक गाड्या अर्धा तास ते दोन तासांपर्यंत उशिराने धावण्याची शक्यता आहे.

मार्गावरील नियमित प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे आणि उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे. रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रकाची माहिती स्थानकांवर तसेच अधिकृत माध्यमांतून उपलब्ध करून दिली असून, प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *