होमिओपॅथी सर्वांसाठी या विषयावर कोल्हापुरात राष्ट्रीय होमिओपॅथिक परिषद

0
WhatsApp Image 2026-10-13 at 12.54.30 PM

 ८०० हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी व होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील आय.सी. आर. स्टडी ग्रुपला २५ वर्षे पूर्ण झाले व हौसाबाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आय. सी. आर. स्टडी ग्रुप, कोल्हापूर आणि हौसाबाई मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने’ होमिओपॅथी सर्वांसाठी’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला ८०० हून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर, पदव्युत्तर विद्यार्थी तसेच होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर उपस्थित होते.

                परिषदेचे उद्घाटन डॉ. मंगेश जतकर, अध्यक्ष, मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड फॉर होमिओपॅथी  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. राजकुमार पाटील, अधिष्ठाता, फॅकल्टी ऑफ होमिओपॅथी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, डॉ. कुमार ढवळे, अध्यक्ष, डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट, मुंबई तसेच डॉ. सुकुमार मगदूम, अध्यक्ष, हौसाबाई मगदूम चॅरिटेबल ट्रस्ट यांची प्रमुख उपस्थिती होती.

                             या परिषदेसाठी डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट, मुंबई आणि पुणे येथील नामवंत होमिओपॅथिक तज्ज्ञांनी विशेष मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये बालकांपासून वृद्धांपर्यंतच्या विविध वयोगटांतील आरोग्यविषयक समस्यांकडे होमिओपॅथिक दृष्टिकोनातून पाहण्याबाबत शास्त्रीय व चिकित्सकीय मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बिपिन जैन यांनी बालकांमधील तीव्र आजारांचे व्यवस्थापन व आधुनिक वैद्यकीय पद्धतीशी होमिओपॅथीचे एकत्रीकरण, डॉ. कुमार ढवळे यांनी किशोरवयातील बदलती आव्हाने व आरोग्य, डॉ. शिरीष फणसळकर यांनी मध्यम वयातील आरोग्यविषयक समस्या व गुणवत्तापूर्ण उपचार, तर डॉ. मनोज पटेल यांनी ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान व निरोगी वृद्धत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

                        उद्घाटनपर भाषणात डॉ. मंगेश जतकर यांनी होमिओपॅथीच्या क्षेत्रात डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच गेल्या २५ वर्षांपासून आय.सी.आर. स्टडी ग्रुप, कोल्हापूर मार्फत होमिओपॅथिक डॉक्टरांची व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा, होमिओपॅथिक महाविद्यालयांमध्ये घेतले जाणारे ओरिएंटेशन कार्यक्रम, तसेच समाजातील गरजू घटकांपर्यंत होमिओपॅथी पोहोचविण्यासाठी सुरू असलेली चॅरिटेबल क्लिनिक आणि मोफत उपचार शिबिरे यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी हौसाबाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या होमिओपॅथिक व फिजिओथेरपी कॉलेजचा गौरवपूर्ण उल्लेख केला व होमिओपॅथिक  हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्ण- समाज सेवेचे कौतुक केले.

                            रुग्णसेवेत डॉक्टरांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी रुग्णाच्या गरजा समजून घेणे, रुग्णाशी संवाद साधणे आणि उपचाराच्या प्रत्यक्ष अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचे आवाहन डॉ. जतकर यांनी केले.  डॉ. राजकुमार पाटील हे आय.सी. आर स्टडी ग्रुप, कोल्हापूरच्या गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीतील समर्थक राहिले आहेत, असे यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी आय.सी. आर. स्टडी ग्रुप कोल्हापूरचे मार्गदर्शक डॉ. प्रविण वडगावे, समन्वयक डॉ. अजय हनमाने आणि स्टडी ग्रुपचे आधारस्तंभ डॉ. राजेश कागले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

                            आय. सी. आर. स्टडी ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या स्टडी ग्रुपमधून प्रशिक्षण घेऊन विविध ठिकाणी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या जुन्या सदस्यांचा विशेष स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ५० हून अधिक माजी सदस्य डॉक्टर आपल्या कुटुंबासहित उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या डॉक्टरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभवांची देवाणघेवाण केली.

                          या कार्यक्रमास हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य सौ. शुभांगी मगदूम,  डॉ. एम. एल. ढवळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बिपिन जैन, डॉ. सुनील भालिंगे, डॉ. अनुप निगवेकर, डॉ. विलास सातपुते, डॉ. विद्याधर खानाज, डॉ. छाया पाटील, डॉ. अभिजीत चौगुले, डॉ. रणजीत ढोले, डॉ. चेतन हेरले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल चिप्परगे मॅडम व आभार प्रदर्शन डॉ. विवेक घाडगे यांनी केले. आय.सी.आर. स्टडी ग्रुपच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीचा हा रौप्यमहोत्सव होमिओपॅथिक क्षेत्रातील डॉक्टर, विद्यार्थी आणि माजी सदस्यांना एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *