मध्यवर्ती युवा महोत्सवात मिरजेच्या साळुंखे कॉलेजचे घवघवीत यश: विविध कला स्पर्धेत पटकावली पारितोषिके
मिरज (प्रतिनिधी)
विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज च्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलागुणांचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवला.
या महोत्सवात विविध महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज ने आपला दबदबा कायम राखत सांगली जिल्हा वैयक्तिक स्पर्धा सर्वसाधारण फिरता चषक प्राप्त केला. स्पर्धेत महाविद्यालयाच्या चमूने एकापाठोपाठ एक सरस सादरीकरण केले.
यामध्ये धारणा आवटे, अर्जुन साळुंखे, सायली पिसे, सौरभ ठोकळे, ओंकार अंकली, संकेत शिंगे, रेहान मुजावर यांनी सादर केलेल्या मूकनाट्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. एकपात्री अभिनयात ऋता डांगे हिने तृतीय क्रमांक पटकावला. वादविवाद स्पर्धेत समीया बारगिर आणि तरन्नुम शेख यांनी आपल्या वक्तृत्वाने चतुर्थ क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी विभागात तरन्नुम शेख हिने चौथा क्रमांक तर हिंदी विभागात समिया बारगिर हिने पाचवा क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशवंत हरताळे, डॉ. स्वाती हाके, डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. सुहास वाघमोडे, डॉ. सविता राऊत, श्रीमती आशा पोतलवाड, डॉ. संजय कांबळे, प्रा. तेजस गवळी, डॉ. शिल्पा खैरमोडे व श्री अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी कामगिरीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे पदाधिकारी कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. अर्जुन जाधव यांनी सर्व सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल संपूर्ण मिरज परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


