जागतिक संधिवात दिनानिमित्त ‘र्ह्यूमा केअर’मध्ये जनजागृती ; रुग्णांना किटचे वाटप
मिरज (प्रतिनिधी)
जागतिक संधिवात दिनानिमित्त परमशेट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज येथील ‘र्ह्यूमा केअर’मध्ये सोमवार (दि. १२) रोजी संधिवाताविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व रुग्णांना आजारोपयोगी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. श्रुती परमशेट्टी (एम.डी. मेड., कन्सल्टंट र्ह्युमॅटोलॉजिस्ट, फेलोशिप इन र्ह्युमॅटोलॉजी अँड इम्युनॉलॉजी), डॉ. विनोद परमशेट्टी (एम.डी. मेड.) आणि डॉ. वैश्णवी गवळी यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. श्रुती परमशेट्टी म्हणाल्या, संधिवातामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज, आखडलेपणा आणि हालचालींमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष देणे, वेळेत निदान करणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. योग्य उपचारांमुळे आजार नियंत्रणात ठेवून जीवनमान सुधारण्यास मदत होते.
यावेळी त्यांनी संधिवाताचे विविध प्रकार, लक्षणे, आधुनिक उपचारपद्धती, नियमित तपासणी आणि औषधोपचारांचे महत्त्व याविषयी त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमास विद्याधर परमशेट्टी, प्रमोद घाडगे आणि उमेश बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


