वृद्धांनी चिंता करण्यापेक्षा चिंतन करावे : भीमराव धुळूबुळू
मिरज, दि. ४ (प्रतिनिधी)
वृद्धांनी चिंता करण्यापेक्षा चिंतन करावे. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, संघर्षाचे प्रसंग आणि अनुभव आत्मचरित्राच्या माध्यमातून पुढे आणावेत, असे मत परिसंवादाचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, सांगली शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठांच्या साहित्य संमेलनातील ‘आनंदी वृद्धत्व व मराठी साहित्य’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी डॉ. अनिल मडके आणि डॉ. दिलीप शिंदे सहभागी झाले होते.
धुळूबुळू म्हणाले, “साहित्य ही कला आहे. लेखनाचा छंद जोपासल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक वेदनांवर मात करता येते. आयुष्यातील अनुभव शब्दबद्ध करणे हीच आनंदी वृद्धत्वाची वाट आहे.”
डॉ. अनिल मडके म्हणाले, व्यायाम आणि साहित्याचा छंद असणाऱ्या व्यक्तीला औषधांची फारशी गरज भासत नाही. सकारात्मक विचारांच्या माध्यमातून जीवनातील दुःखावर मात करता येते. तारुण्यातील अपूर्णता ज्येष्ठत्व भरून काढते, त्यामुळे ज्येष्ठ नेहमीच तरुणांच्या पुढे असतात.
डॉ. दिलीप शिंदे यांनी, प्रत्येकाच्या मनात आनंद दडलेला असून साहित्याच्या माध्यमातून तो अधिक खुलतो, असे सांगितले. यावेळी यशदाचे अतिरिक्त संचालक शेखर गायकवाड, संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे, मसाप सांगलीचे अध्यक्ष संजय ठिगळे, कार्यवाह अभिजित पाटील, वर्षा चौगुले, नामदेव माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा पाटील हारोळीकर यांनी केले.


