संतोषवाडीतून चोरीला गेलेला ट्रॅक्टर कर्नाटकातून हस्तगत; संशयित ताब्यात
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई
मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथून चोरी करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व औषध फवारणीचा ब्लोअर मिरज ग्रामीण पोलिसांनी कर्नाटकातून हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. सदरचा ट्रॅक्टर विकत घेणाऱ्या संशयित असेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या अन्य एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. मेहबूब गौसमोदी सारवान (वय ३५, रा. तीकोटा, कर्नाटक) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रॅक्टर चोरणारा संशयित दत्ता उर्फ हजाप्पा लाळे (रा. तीकोटा) या संशयीताचे नाव पोलिसांना निष्पन्न झाले आहे.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन पवार, सायबर शाखेकडे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली. दिनांक २३ ते २४ ऑक्टोंबर रोजी मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथून दिग्विजय काकासाहेब इंगवले यांचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर व औषध फवारणीचा ब्लोअर चोरीस गेला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी कौशल्यपूर्णरित्या तपास करीत तिकोटा येथील हजाप्पा लाळे या संशयीत आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. तो मेहबूब सारवान (रा. तिकोटा) याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी येथे कारवाई करून सारवान यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता लाळे याने सदरचा ट्रॅक्टर ब्लोअर त्यास विकला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


