कागल तालुक्यातील अवैद्य धंदे पंधरा दिवसात बंद करा

अन्यथा १० मार्च रोजी मुरगुड पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन
सेनापती कापशी (प्रतिनिधी)
कागल तालुक्यातील अनेक गावातील अवैद्य धंदे येत्या पंधरा-वीस दिवसात बंद करुन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या १० मार्च, पुण्यदिनी स्मृतिस्थळास अभिवादन करून मुरगूड पोलीस स्टेशन वर एक दिवसाचे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कागल तालुका नशामुक्ती जन आंदोलनचे निमंत्रक ॲड. दयानंद नानासाहेब पाटील- नंद्याळकर ( जिल्हा समन्वयक सरपंच परिषद) यांच्यासह महिला सरपंचसह परिसरातील ग्रामस्थ यांनी दिला आहे दिला आहे.याबाबतची निवेदन पालकमंत्री नाम.प्रकाशरावजी आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री याना दिले आहे.तसेच वैद्यकिय शिक्षण मंञी हसनसो मुश्रिफ यांना मेलद्वारे दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कागल तालुक्यामध्ये मुख्यतः मुरगुड पोलीस स्टेशन हद्दीतील चिकोत्रा खोऱ्या मधील अर्जुनवाडा ,मेतके, मुगळी, तमनकवाडा, हणबरवाडी, बेरडवाडी,हळदवडे ,माद्याळ ,बोळावी ,बोळावीवाडी,हसुर बुद्रुक, ठाणेवाडी या गावांमध्ये तसेच कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनूर ,बस्तवडे , बानगे ,मळगे या गावात गेली अनेक वर्षापासून राजरोसपणे गावठी दारू विक्री सुरू आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत गावामधून देशी व विदेशी दारू अवैद्यरीत्या विकली जात आहे. शेजारील कर्नाटक राज्य मार्गे गोवा राज्यातून तस्करीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. सध्या अनेक गावच्या यात्रा, जत्रा यामध्ये अनेक अवैद्य धंद्याना ऊत आला आहे.
ग्रामीण भागातील गावागावात प्रामुख्याने गोरगरीब कुटुंबातील रोजंदारी, मोलमजुरी करणारे, ऊस तोडणी कामगार, सामान्य नागरिक स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या गावठी दारूच्या व्यसनाधीन झाले आहेत. त्यामुळे सातत्याने गोरगरीब कुटुंबामध्ये प्रापंचीक कलह, भांडण -तंटे, आत्महत्या, दारुविषबाधा सारखे प्रकार घडून कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीन मुळे देशोधडीला लागत आहेत. तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये अवैधपणे सहज उपलब्ध होणाऱ्या देशी दारू, इंग्लिश , अफू गांजा तसेच अनेक ठिकाणी चालू असलेली मटका- जुगार अड्डे यामुळे तालुक्यातील युवक वर्ग व्यसनाधीन होत आहे. गावठी दारूमुळे दिवसेंदिवस खून,मारामारी, अपघात, आत्महत्या अशा कारणामुळे मुळे मृत्यूस बळी पडणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे.
यानिवेदनात दशरथ कांबळे, बाळासो.सुतार , सागर पाटील, गीतांजली पाटील ,हरी.पाटील, अनिल पाटील, आनंदी पाटील, कल्पना लुगडे, संध्या पाटील,बळीराम पाटील, जीवन लुगडे, आदिशा कदम , लता कदम ,सरिता पाटील,अनुसया पाटील ,साधना पाटील ;दिनकर जाधव, जीवन फेगडे,प्रकाश तेजम, वैभव जांभळे ,मारुती तोडकर, सुदाम पाटील , आनंदा करडे,संतोष फगरे, युवराज पाटील, रवींद्र येजरे,दिंगबर शेळके, लक्ष्मण इंगवले, दादू शेळके, सरिता कांबळे,दिनकर शेळके यांच्यासह अनेक गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.