प्रत्येकाने आपले १००% योगदान दिल्यास २०४७ पर्यंत भारत बनेल विकसित राष्ट्र – बिरादार

0
WhatsApp Image 2025-03-09 at 12.26.06 AM

बापूजी साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न

मिरज (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाश्वत विकासाचा मार्ग भारताने स्वीकारला आहे. विकसित भारत म्हणजे आत्मनिर्भर भारत बनविणे हे ध्येय आहे. विकसित भारताच्या अनुषंगाने मानवी विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, प्रत्येक भारतीयांनी आपल्या क्षेत्रात शंभर टक्के योगदान दिल्यास २०४७ पर्यंत भारत नक्की विकसित बनेल, अशा विश्वास केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक येथील प्रा. डॉ. आर. आर. बिरादार यांनी व्यक्त केला. मिरजेत बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या ‘वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारताचा विकास: आयाम आणि गतिशिलता (Development of India: Dimensions and Dynamics)’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. ते म्हणाले, आज जगात भारताची ओळख एक वेगवान विकसित होणारा देश अशी बनत आहे. मात्र काळाबरोबर विकास या संकल्पनेत अनेक बदल होत आहेत. या अनुषंगाने भारताच्या विकासाची गतिशीलता या विषयावर संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व चर्चा घडून यावी, या हेतूने आमच्या महाविद्यालयात या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.’

अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे होते. ते म्हणाले, ‘विकसित भारताचा विचार करीत असताना स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान, संतांची कामगिरी विसरून चालणार नाही. स्वराज्याचे सुराज्य बनवून भारताचा विकास करण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची कास धरली. विकासाकडे वाटचाल करीत असताना संस्कार जपले पाहिजेत, ते जपण्याचे काम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने केले आहे.’

पहिल्या सत्राचे साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. एम. एस‌. देशमुख (अधिष्ठाता, मानव्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) तर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. व्ही. बी. जुगळे (माजी विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचे साधन व्यक्ती म्हणून मा. प्रा. डॉ. ए. एम. गुरव (विभाग प्रमुख, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग) व अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. एस. एस. कुलकर्णी (विभाग प्रमुख, कॉमर्स विभाग, कन्या महाविद्यालय, मिरज) हे उपस्थित होते.

समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात विकास म्हणजे वाढते राष्ट्रीय उत्पन्न अशी धारणा होती, नंतरच्या काळात विकासाची संकल्पना मानवी विकासाशी जोडली गेली. सामाजिक विकास, आर्थिक विकास, राजकीय व पर्यावरण विकास असे विकासाचे विविध पैलू आहेत. भारत या सर्व पैलूंमध्ये अग्रेसर होत आहे. अर्थिक विकासाच्या दृष्टीने भारत जगात पाचव्या स्थानावर, तर सामाजिक विकासाच्या दृष्टीनेही भारत अग्रेसर आहे. भारत सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. भारताची सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होत असताना सुसंस्कार जपले पाहिजेत.’

पाहुण्यांचा परिचय डॉ. स्वाती हाके यांनी करून दिला. आभार डॉ. शहिदा जमादार यांनी मानले . सूत्रसंचालन प्रा. आशा पोतलवाड आणि डॉ. शिल्पा खैरमोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. यशवंत हरताळे, डॉ. शहिदा जमादार, डॉ. स्वाती हाके, डॉ.अशोक हेरवाडे, डॉ. सविता राऊत, प्रा. अरुणा सकटे, प्रा. संजय पाटील, डॉ. प्रमिला जाधव, प्रा.राजकुमार गीते, प्रा. प्रांजली पाटील, प्रा. स्वप्नील दाते, प्रा. शफा मुलाणी, प्रा. मयुरी कदम व महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड इ. राज्यातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे १२० पेक्षा अधिक आलेले शोधनिबंध ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील १९० अभ्यासक सहभागी झाले. याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *