आपली बलस्थाने ओळखून करिअरची निवड करा- डॉ. आशिष पुराणिक

सांगली (प्रतिनिधी)
यशस्वी विद्यार्थ्यांनी करिअरच्या केवळ विशिष्ट मळलेल्या वाटेवरून न जाता आपली बलस्थाने ओळखून करिअर ची निवड करावी असे प्रतिपादन चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आशिष पुराणिक यांनी केले .ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांगली यांच्यावतीने दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मंगेश मंत्री होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष मंगेश ठाणेदार तसेच महिला आघाडी अध्यक्ष कविता कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ. पुराणिक यांनी पुढे सांगितले की विद्यार्थ्यांनी यशाची पंचसूत्रे समजावून घेउन वाटचाल करावी . तर मंगेश मंत्री यांनी यावेळी यशस्वी उमेदवारांना नोकऱ्या घेणारे न होता , नोकऱ्या देणारे होण्याचे आवाहन केले. तसेच गुणवत्ता ,जिद्द , मेहनत यातून अपेक्षित असे यश गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
यावेळी सीईटी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला अथर्व सहस्रबुद्धे याचा सत्कार केला गेला. त्याने आपल्या यशाचे रहस्य मेहनत, गुणवत्ता वृद्धीसाठी पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन या बरोबरच मोबाईल चा केवळ अभ्यासासाठी वापर असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात मंगेश ठाणेदार यांनी ब्राह्मण तरुणांनी व्यावसायिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुरामांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वागत महिला आधाडी अध्यक्षा कविता कुलकर्णी यांनी केले. अमृत योजनेचे जहागीरदार यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन लीना कुलकर्णी यांनी केले. अनिता वाटवे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास वरिष्ठ केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, निवृत्त केंद्रीय अबकारी कर अधीक्षक विनायक काळे, ज्येष्ठ उद्योजक अरुण कुलकर्णी, विनय देशपांडे , सीए महेश ठाणेदार, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते वैभव कुलकर्णी, सारस्वत ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. कोटणीस, विश्रामबाग ब्राह्मण सभा उपाध्यक्ष संजय सोनटक्के, माजी नगरसेविका भारती दिगडे आदी मान्यवर यांचे सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव विशाल जेऊरकर, सौरम गोखले, निरंजन कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, आशिष जोशी, प्रणाली कुलकर्णी, सीमा दांडेकर, ज्योत्स्ना जोशी, कोमल इनामदार, आशा फडणीस यांनी केले.