माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

सांगली (प्रतिनिधी)
आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी आयएओ- यूएसए द्वारे मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थेच्यावतीने सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांना सामाजिक कार्य आणि लोककल्याण या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदविने गौरविण्यात आले.
डॉ. ज्योती आदाटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झुंज देऊन आपले विश्व निर्माण केले. अगदी विद्यार्थीदशेपासुनच सामाजिक चळवळीत झोकून दिले त्यामुळेच कोणतीही पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येऊन हॅट्रीक होण्याचा मान त्यांनी मिळवला. संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून दिला. कोरोना व महापुराच्या काळात जिवावर उदार होऊन त्यांनी लोकांमध्ये राहुन त्यांना आधार देण्याचे काम केले. आकार फौंडेशनच्यावतीने एकल पालक संस्थेत असलेल्या अनाथ मुलीला शैक्षणिक दत्तक घेऊन तिला स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टीम सोबत अनेक भोंदूबाबाचा पर्दाफाश केला तसेच चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहीत प्रबोधनाचे उपक्रम राबवत आहेत. तसेच नाट्य चित्रपटात काम करून सांस्कृतिक क्षेत्रात देखील ठसा उमटविला आहे. गेल्या 35 वर्षापासून समर्पित पणे सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.यामुळेच त्यांच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वरील संस्थेने नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. यावेळी अंनिसची कार्यकर्ती प्रियांका तुपलोंडे तसेच अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.