गगनबावड्यात १७ ते १८ मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
गगनबावडा (प्रतिनिधी) :कोल्हापूर शहरातून आणून १३ ते १७ मोकाट कुत्रे गगनबावडा तालुक्यात सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर कुत्र्यांचे कळप सध्या गगनबावडा, जांभूळनेवाडी, सांगशी, भुतलवाडी, पारगांवकरवाडी या परिसरात फिरताना दिसत असून गावात कोंबडी, मांजर यांना भक्ष करत आहेत. आता तर जंगलात राहणाऱ्या प्राण्यांवर हल्ले करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
या मोकाट कुत्र्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कुत्रे आता मुख्य रस्त्यांवर फिरू लागले आहेत. त्यामुळे शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी धोक्याची बाब ठरत आहे. पालकांनी आपल्या मुलांना सतर्कतेने पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी या कुत्र्यांना उगाच त्रास देण्याचा, दगड मारण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रशासन किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असा संदेश देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरात या मोकाट कुत्र्यांनी सांबर, भेकर व अन्य वन्यजीवांवर हल्ले केल्याने वनविभागाचे कर्मचारी हतबल झाले आहेत. भारतीय न्याय संहिता सेक्षण २९१ नुसार कुत्र्यांवर कारवाई करता येत नसल्याने वनविभाग व ग्रामपंचायतीचे हात बांधले आहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांवर कुणी कारवाई करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.