‘महादेवी’ला परत आणण्यासाठीच्या लढ्यात आम्ही नांदणी मठासोबत

विश्वजीत, विशाल यांची नांदणीत भट्टारकांसोबत चर्चा
सांगली (प्रतिनिधी)
महादेवी हत्तीण परत नांदणी मठात यावी, यासाठी जैन समाजासह सर्व धर्मियांनी ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे, ती खरचं कौतुकास्पद आहे. या हत्तीणीला परत आणण्याच्या लढ्यात आणि ती परत आल्यानंतर तिची सर्वोत्तम सोय करण्यात आमचा सक्रिय सहभाग राहील, अशी ग्वाही आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आज नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्याशी चर्चेवेळी दिली.
विश्वजीत आणि विशाल यांनी आज दुपारी नांदणी येथील मठात जावून भट्टारकांची भेट घेतली. या मठाची दीर्घ परंपरा आणि जैन धर्मियांच्या मठाशी जोडल्या गेल्या भावना, हत्तीणीच्या संगोपणाचा मठाचा इतिहास, महादेवी हत्तीच्या काळजीसाठी घेतली जाणारी खबरदारी, न्यायालयीन प्रक्रियेत झालेल्या घडामोडी, वनतारा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा आणि भविष्यातील दिशा या विषयावर भट्टारकांनी या दोन्ही युवा नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. समाजाच्या सर्व स्तरातून, समाज जाती-धर्मातून मिळालेला पाठींबा हा आमचे बळ वाढवणारा आणि हा मठ सर्व समाजाचा असल्याचे दर्शविणारा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयीन पातळीवर, केंद्र सरकारच्या पातळीवर जी काही लढाई आवश्यक आहे, त्यात काँग्रेस पक्ष म्हणून आणि व्यक्तीगत स्वरुपात कदम आणि पाटील कुटुंबिय म्हणून आम्ही सोबत उभे आहोत. हत्तीण परत आल्यानंतर तिच्या सोयीसुविधांसाठी जे काही आवश्यक असेल तर आमचा पुढाकार असेल, अशी ग्वाहीदेखील या दोन्ही नेत्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार नांदणी ते कोल्हापूर निघालेल्या पदयात्रेत सहभाग घेतला. मध्यंतरावेळी श्री. शेट्टी यांच्याशी चर्चा केली. या यात्रेत सहभागी तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना त्यांना सांगितल्या. तरुणांची एकजूट समाजाच्या हितासाठी अशी नेहमी ठेवा, बदल होईपर्यंत लढूया, आपली एकजूट निश्चित यशापर्यंत पोहचेल, असा विश्वासदेखील तरुणांना त्यांनी दिला. ॲड. अमोल चिमाण्णा, शितल थोटे, संतोष वंजाळे, संदीप आडमुखे, विशाल चौगुले, बी. डी. पाटील, अमित पाचोरे आदी उपस्थित होते.