‘स्पंदन हृदयालय’ मुळे मिरजेत आरोग्यसेवेचे नवे पर्व – समित कदम

९६-स्लाईस रिकन्स्ट्रक्शन सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन
मिरज (प्रतिनिधी)
शहरात नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हृदयालय व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात नव्याने मोलाची भर घातली आहे. सांगली-मिरज व परिसरात उभारण्यात आलेली अनेक गंभीर आजारांवरील उपचाराची रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज आहेत. या रुग्णालयामुळे रुग्णांना आता मुंबई, पुण्यासारख्या शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. सांगली-मिरज मेडिकल हब खऱ्या अर्थाने अस्तित्वात येत असल्याचे गौरवोद्गार जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी काढले.
चंदनवाडी येथे स्पंदन हृदयालय आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे. काही महिन्यात या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन रुग्णालय सेवेसाठी सज्ज झाले आहे. आतापर्यंत अनेक गंभीर हृदय रुग्णांवर येथे यशस्वीपणे उपचार करुन त्यांना जीवदान देण्यात आले आहे. अतिशय प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा रुग्णालयात वापर करण्यात आला असून, जो राज्यात क्वचितच ठिकाणी असेल, त्यामध्ये ९६ स्लाईस रिकन्स्ट्रक्शन सिटी स्कॅन या तंत्रज्ञानाची नव्याने भर पडली आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी कदम बोलत होते.
सांगली-मिरज परिसरात गेल्या काही वर्षात अतिशय प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णालये उभारली गेली आहेत. या मशिनरीसाठी उच्च शिक्षित वैद्यकीय तज्ज्ञही शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील रुग्णांना मुंबई, पुणे शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. भविष्यात अशा रुग्णालयांसाठी कोणतीही मदत देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी रुग्णालयात नवनवीन उभारण्यात आलेल्या मशिनरी, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, कॅथलॅब यासह नव्याने बसविण्यात आलेल्या ९६-स्लाईस रिकन्स्ट्रक्शन सिटी स्कॅन मशिनची माहिती दिली. सदरची मशिनरी मेंदू, छाती, स्ट्रोक, ट्रामा, अँजिओग्राफीसाठी उपयुक्त असून, १६० किलो पर्यंतच्या रुग्णांसाठी योग्य पध्दतीने स्कॅनिंग केले जाते. स्पष्ट आणि अचूक प्रतिमा दाखविण्यात ही मशिन उपयुक्त ठरते, असे डॉ. मुजावर म्हणाले. यावेळी डॉ. अमित जोशी, डॉ. योगेश जमगे, डॉ. सचिन गावडे, डॉ. शबाना मुजावर, डॉ. मथुरा जोशी, डॉ. अमृता जमगे, डॉ. स्वाती गावडे व चौंडीकर सर उपस्थित होते.