माधुरी हत्तीणीला परत आणण्याची जिजाऊ चॅरिटेबल संस्थेची मागणी

मिरज (प्रतिनिधी)
नांदणीतील जिनसेन मठातून स्थलांतर केलेल्या माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणीतील मठातच स्थलांतर करावे. लोकभावनेचा आदर करुन शासनाने आपल्या निर्णयात बदल करुन लोकांसाठी हत्तीणीस नांदणीला मूळस्थानी स्थलांतर करावे, अशी मागणी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय मिसे यांच्या नेतृत्वाखाली प्राणी मित्र व कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
नांदणी येथील जिनसेन स्वस्तिश्री मठातील माधुरी हत्तीणीचे न्यायालयीन आदेशानुसार स्थलांतर केलं गेलं, मात्र या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भावनिक लाट उसळली आहे. संपूर्ण जैन समाज तसेच इतर सर्व समाजात याबद्दल तीव्र नाराजी आहे. महादेवी हत्तीण हा कोल्हापूरकरांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे शेकडो वर्षाची संस्कती व परंपरा मोडण्याचे कटकारस्थान केले जात आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. माधुरी हत्तीण परंपरा, भक्ती आणि नात्याचे प्रतिक आहे. त्यामुळे सदर हत्तीणीला पुन्हा नांदणीतील मठात मुळ जागेवर स्थलांतर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.