लोकशाही बळकटी करण्यास लोकांनी जागृत राहणे आवश्यक- ईश्वर रायण्णावर

लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमाला सुरू
सांगली (प्रतिनिधी)
लोकशाही बळकटी करण्यासाठी लोकांनी जागृत राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते ईश्वर रायण्णावर यांनी केले. ते लोकमान्य टिळक स्मृती वाचनालय, बामणोली यांच्या वतीने आयोजित ४ थ्या लोकमान्य व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे केंद्रीय जीएसटी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, बामणोलीच्या सरपंच गीता चिंचकर, माजी सरपंच सावळाराम शिंदकर, उप सरपंच लवटे, माजी सरपंच राजेश सन्नोळी, नाट्य परिषद सांगली उपनगर २ चे अध्यक्ष विनय देशपांडे आदी प्रमुख उपस्थित होते.
अमृत महोत्सवी लोकशाही आणि त्यापुढील आव्हाने विषयावर बोलताना ईश्वर रायण्णावर यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील नागरिकांची मानसिकता ही लोकशाहीला शासन पद्धतीस पोषक असली तरी केवळ मतदान हे आपले कर्तव्य न मानता लोक प्रतिनिधीं जनतेस जबाबदार कसे राहतील, हे जनतेने पाहिले पाहिजे असे सांगितले.
लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार यासाठी प्रेरक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रंथालयाचे प्रमुख विनय देशपांडे यांनी प्रास्ताविकात बामणोली येथील या ग्रंथालयाचा, व्याख्यानमालेचा फायदा परिसरातील नागरिक ,स्पर्धा परीक्षा उमेदवार मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे सांगितले . यावेळी डॉ यशवंत तोरो, ना.बा. देशपांडे, सीए किरण देशपांडे, मुकुंद करंदीकर , प्रशांत बामणे, सतीश शिंदकर, उमेश वरणकर ,अंकुश कदम सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात यशवंत कुलकर्णी यांचे मी बाबुराव बोलतोय – गप्पा व किस्से तर तिसऱ्या सत्रात डॉ. दयानंद नाईक यांचे नाटक व आपले जीवन या विषयावर व्याख्यान झाले.