गणपती बाप्पा येत आहेत, रस्ते लाईटची सुविधा करा ; निरंजन आवटींचे आयुक्तांना निवेदन

मिरज (प्रतिनिधी)
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, मिरजेतील रस्ते व लाईट यांची व्यवस्था महापालिकेने प्राधान्याने आणि नीटनेटकी करावी, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात आवटी यांनी नमूद केले की, मिरजेत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सुविधा देण्याबाबत महापालिकेने गंभीरतेने लक्ष घालावे. मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे काढले जातात, त्यासंदर्भात घेतली जाणारी रक्कम व फीमध्ये सवलत देण्यात यावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क काँक्रीट पद्धतीने करावे, मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, गणेश तलाव स्वच्छ करावा तसेच गणेश तलाव व कृष्णा घाट येथे मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळात महिलांसाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध करावी. न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील जागेचे संपादन करावे. मिरजेतील श्री महालक्ष्मी मूर्ती आणि छत्रपती शाहू महाराज स्मारक सुशोभित करावे, अशा मागण्या आवटी यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.