महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर, मिरज इमारतीला गळती

मिरज सुधार समितीकडून महापालिका मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा व अधिकाऱ्यांची उदासिनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे. सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मिरज विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज इमारतीचा पंचनामा केला. टक्केवारीसाठी हपापलेल्या ’’महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर, मिरज इमारतीला गळती’’ अशी गत मिरज इमारतीची झाली असल्याची टीका करत कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका अस्तित्वात येऊन २७ वर्षे पुर्ण झाली. सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे. तर, बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्म-मृत्यू, जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकतच नाही. अधिकारी जागेवर नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोसे बनला आहे. सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपीक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाही.
गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत. त्यामुळे मिरज विभागीय कार्यालयावर अधिकाऱ्यांनी एकप्रकारे बहिष्कारच टाकला आहे. ४२ वर्षापूर्वी तत्कालीन मिरज नगरपालिका असताना मिरज इमारत बांधण्यात आली. २७ वर्षापूर्वी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर इमारतीच्या दर्शनीला भागाला रंगरंगोटी करण्यापलिकडे काहीच सुधारणा केलेली नाही. त्यामुळे इमारतीमधील सहाय्यक आयुक्त कार्यालय, कर निर्धारण विभाग, गुंठेवारी विभाग, जलनिस्सारण विभाग आदी विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती लागून महत्वाचे कागदपत्रे खराब होत आहेत. मात्र, याची कसलीच सोयरसुतक महापालिका अधिकाऱ्यांना नाही.
मंगळवारी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, असिफ निपाणीकर, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजीत दाणेकर, संदीप हंकारे, संतोष जेडगे आदी सदस्यांनी गळती लागलेल्या ठिकाणी पाहणी करत मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा केला. मिरज विभागीय कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.