ज्या व्यक्तीला भूतकाळ माहित नाही, त्याचा वर्तमान सिमित – डॉ. अवनीश पाटील

0
IMG-20250817-WA0018

साळुंखे महाविद्यालयात इतिहासाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)

इतिहास शिकताना भूतकाळाची जाणीव ठेवली पाहिजे. आज ज्या गोष्टी घडतात, त्याची कारणे भूतकाळात असतात. ज्या व्यक्तीला भूतकाळ माहित नाही त्याचा वर्तमान सीमित आहे. मागे काय घडले याची जाणीव झाल्याशिवाय वर्तमान समजत नाही, असे प्रतिपादन डॉ. अवनीश पाटील यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या बी. ए. भाग- २ च्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेमध्ये केले.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्यावतीने आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार बी. ए. भाग २ च्या इतिहास विषयाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमाची अतुल्य भारत आणि भव्य महाराष्ट्र या विषयाची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.)चंद्रवदन नाईक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील होते. बीजभाषक शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील होते.

आपल्या बीजभाषणात डॉ. अवनीश पाटील पुढे म्हणाले,’अतुल्य भारत आणि भव्य महाराष्ट्र हे विषय इतिहास विषय नसणारी इतर विषयांची मुले शिकणार आहेत,त्यामुळे अशा मुलांना विषय कसा शिकवायचा हे शिक्षकांसमोर आव्हान आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक इमारती, भारताच्या विविध भागात साजरे केले जाणारे उत्सव भूतकाळापासून कसे चालत आलेले आहेत, याची माहिती सांगितली पाहिजे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. चंद्रवदन नाईक म्हणाले, ‘अतुल्य भारत आणि भव्य महाराष्ट्र या विषयांमध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चांगले आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत जावे, आपली प्राचीन संस्कृती, वैभवशाली वारसा विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. विद्यार्थ्यांना अर्थार्जनासाठी उपयोगी ठरतील असे विषय बदलत्या रचनेतून आणण्याचा प्रयत्न अभ्यास मंडळाने केला आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, सद्यस्थितीत प्रसारमाध्यमे व शैक्षणिक माहिती देणारे वेगवेगळे ॲपस् यामुळे शिक्षकांपुढील आव्हाने वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या अध्यापन पद्धतीमध्ये काळानुरूप ,बदल गरजेचे आहे. त्यासाठी अशा शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त ठरतात.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. धीरज शिंदे, इचलकरंजी , प्र. प्राचार्य प्रा.(डॉ.)स्वाती सरोदे, कराड, या साधन व्यक्तींनी OE-III ‘अतुल्य भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. अजित जाधव, सातारा यांनी OE -IV ‘भव्य महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या दोन्ही सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. आरती नाडगौडा, अर्जुन नगर यांनी भूषविले. समारोप समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉ . उर्मिला क्षीरसागर या होत्या. अध्यक्षस्थानी हातकणंगले येथील प्रा. (डॉ.) संघमित्रा सरवदे या होत्या.

प्रास्ताविक महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी केले. तर आभार डॉ. शुभांगी भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती हाके यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. सुहास वाघमोडे, डॉ.वाय. डी. हरताळे, डॉ. पुष्पा पाटील, प्रा. संजय पाटील, प्रा. अभिषेक चौगले, महाविद्यालयाचे प्रबंधक रावसाहेब लवटे, शहाजहान मुजावर, रवी जाधव, नेर्लकर, विष्णू पाटील, नामदेव भोसले, अक्षय शिंदे, भास्कर भोसले, शशिकांत कोठावळे, राहुल कदम, श्रीकांत कदम, इतिहास विभागाच्या विद्यार्थिनी स्वालिया मुलाणी, कु. तन्वी शिंदे, कु. दिव्या खामकर यांच्यासह सर्व विभागांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहास विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *