सांगलीत शुक्रवारी शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रम
सांगली (प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शाहिरी लोककला संमेलन दि.२२ ऑगस्ट रोजी सांगली येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्रभरातील शाहीर, गोंधळी, तमाशा, आराधी, वाघ्या-मुरळी, डोंबारी, वासुदेव अशा विविध लोककला प्रकारांतील नामवंत कलावंत सहभागी होणार आहेत.
या संमेलनाचे आयोजन लोककलावंत राज्य समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले असून, सांगली जिल्हा निमंत्रक समितीही या कार्यक्रमासाठी कार्यरत आहे. संमेलनाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांचे नातू माननीय सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात प्रा. डॉ. बाबुराव गुरव व प्रा. सुकुमार कांबळे यांचे बीजभाषण होणार आहे.
या संमेलनात लोककला जीवन गौरव पुरस्कार आळंदीचे आदिनाथ महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप चांदीचे कडं आणि सन्मानचिन्ह असे असेल. याशिवाय पाच महिला व पाच पुरुष लोककलावंतांचा विशेष सत्कार ‘फुलपोशाख’ देऊन केला जाणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील कलावंत आपले सादरीकरण करतील. भीमगायिका कडूबाई खरात, लोकगायक चंदन कांबळे, शाहीर देवानंद माळी, सत्यभामा आवळे, बलराज काटे, शाहीर शितल साठे, शाहीर सचिन माळी, शाहीर राजीव चव्हाण, मयूर उबाळे, अमर पुणेकर, मन्सूर शेख, पृथ्वीराज माळी आदी कलावंत आपल्या शाहिरी कलेतून अण्णाभाऊ व वामनदादांना अभिवादन करणार आहेत.
पत्रकार परिषदेस प्रा. सुकुमार कांबळे, शेवंताताई वाघमारे, दादासाहेब कस्तुरे, आकाश तिवडे, गॅब्रियल तिवडे, चंद्रकांत गायकवाड, संगीताताई शिंदे, शाहीर शितल साठे, शाहीर सचिन माळी, अनिकेत मोहिते, प्रकाश कांबळे, विनायक हेगडे आदी उपस्थित होते.
यांचा होणार सन्मान–
शाहीर अमरशेख पुरस्कार : आलम बागणीकर
विठाबाई नारायणगावकर पुरस्कार : सुनिता गायकवाड
ओवीकार बबन ईश्वर थोरात पुरस्कार : बंपत थोरात
तमाशासम्राट काळू बाळू पुरस्कार : मीनाताई गेवंडे
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार
यमुनाबाई वाईकर पुरस्कार : नंदा कुडाळकर
छगन चौगुले पुरस्कार : सुरेश लसूणकुटे
केशवराव बडगे पुरस्कार : कोंडीबा पाचंगे
रोशन सातारकर पुरस्कार : पापादेवी भंडारे
शाहीर विठ्ठल उमप पुरस्कार : ताराबाई गोरखे