पन्हाळा तहसीलदारांकङून बाजारभोगाव महसूल पथकाचे कौतुक

0
बाजारभोगाव




बाजारभोगाव (प्रतिनिधी)

पूरग्रस्त भागातील आपत्ती व्यवस्थापन कार्यवाहीदरम्यान किसरुळ येथील गर्भवती महिलेचे प्राणवाचक स्थलांतर यशस्वीपणे पार पडले. बाजारभोगाव महसूल पथक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस यांची समन्वित कामगिरी यामध्ये ठळकपणे दिसून आली. या शौर्यपूर्ण कार्याबद्दल तहसीलदार माधवी शिंदे यांनी विशेष कौतुक केले

पूरपाण्यात अडकलेल्या गर्भवती महिलेचे किसरुळहून बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बोटीद्वारे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार देऊन महिलेची स्थिती स्थिर केली.या मोहिमेत मंडलाधिकारी नलिनी मोहिते, बाजारभोगाव ग्राम महसूल अधिकारी राणी सुतार, काटेभोगाव अधिकारी सुनंदा माने, कोतवाल संभाजी कुंभार यांच्यासह दिपक गुरव, बापू पोवार, सुभाष सावत यांचा सक्रिय सहभाग होता तसेच ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण, सुरेश पाटील, क्लार्क संदीप पाटील यांचीही महत्त्वपूर्ण साथ लाभली. आपत्ती व्यवस्थापन पथक व कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनीही मोलाचे सहकार्य दिले.


दरम्यान तहसीलदार माधवी शिंदे व गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी दुपारी बाजारभोगाव येथे भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देऊन किसरुळ येथील गर्भवती महिलेची विचारपूस केली. यावेळी महसूल पथक, आपत्ती व्यवस्थापन दल व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या कार्याची त्यांनी स्तुतिसुमने उधळली

पूरस्थिती लक्षात घेता तहसीलदारांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी समन्वय साधून तत्काळ मदत कार्यवाही करावी, असा संदेश दिला यावेळी  बाजारभोगाव सरपंच सिमा नितीन हिर्डेकर, महसूल व शासकीय कर्मचारी उपस्थित होते. गर्भवती महिलेचे प्राणवाचक स्थलांतर यशस्वीपणे पार पाडून महसूल व प्रशासन पथकाने आदर्श कार्य घडवून आणले असून, तहसीलदारांनी केलेले कौतुक ही त्यांच्या सेवाभावाची मोठी पावती ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *