मिरजेत कृष्णेने ओलांडली इशारा पातळी; जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढून ४८ फूटावर पोहोचली असून इशारा पातळी (४५ फूट) ओलांडली आहे. महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या परिसरातील जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत. तसेच कृष्णा घाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वा. कृष्णा घाटावरील पाणीपातळी ३८ फूट होती. अवघ्या २१ तासांत तब्बल ११ फूट वाढ नोंदवली गेली असून २० ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता पाणीपातळी ४९ फूटांवर पोहोचली आहे. यामुळे कुरणे मळा परिसरातील जनावरे हलविण्याची तातडीची कारवाई महापालिकेने केली आहे. दरम्यान, कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत पाणी शिरल्याने अंत्यसंस्कारासाठी पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचा पर्यायी वापर सुरू करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील यांनी पथकासह प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांकडून गर्दी वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला व आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.