केदारलिंग विकास सेवा संस्थेची ७१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात .

१५ टक्के लाभांश देणार – अध्यक्ष भगवान पाटील यांची माहिती
बाजारभोगाव (प्रतिनिधी )
पिसात्री (ता. पन्हाळा) येथील केदारलिंग विकास सेवा संस्था सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण करत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही संस्था खरा आधार ठरली आहे. गेल्या अनेक दशकांपासून काटकसर, पारदर्शकता आणि सभासदांच्या हितासाठी केलेल्या कामामुळे संस्थेची प्रगती उल्लेखनीय ठरली आहे.
याच वाटचालीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाले. संस्थेचे अध्यक्ष भगवान तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत १५ टक्के लाभांश देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. सचिव शिवाजी आनंदा पाटील यांच्या कुशल कारभारामुळे संस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २१ लाख ५ हजार २७२ रुपयांचा नफा झाला. या कामगिरीबद्दल सभासदांनी सचिव व संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले.
संस्थेचा वार्षिक उलाढाल दीड कोटींपेक्षा अधिक असून सभासदांना लाभांश वाटपात ही संस्था नेहमीच अग्रणी राहिली आहे. तसेच गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून रखडलेला हक्काच्या इमारतीचा प्रश्न अध्यक्ष भगवान पाटील, संचालक सरदार पाटील आणि सचिव शिवाजी पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. लवकरच नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन होणार आहे, ही संस्थेच्या प्रगतीची जाणीव करून देणारी बाब आहे.
सहकार क्षेत्रात केदारलिंग विकास सेवा संस्थेने उभारलेला हा आदर्श कार्यपद्धतीचा मानदंड परिसरातील नवख्या संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सभेत तानाजी पाटील यांनी आरोग्य विमा योजना सुरू करण्याची सूचना केली तर लाभांशाबाबत तुकाराम पाटील, मच्छिद्र सुंबे, गोविदा सुंबे, शिवाजी पाटील यांनी आपले मत मांडले. या सभेला बाळु जोशी, ज्ञानु कांबळे, केराबाई पाटील, नाथा पाटील, भिकाजी धनवडे, युवराज पाटील व कर्मचारी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला बळकटी देणारे काम केल्यामुळे केदारलिंग विकास सेवा संस्था खरच कौतुकास्पद ठरत असून इतर संस्थांसाठी अनुकरणीय आहे.