सांगलीत पूर ओसरू लागताच मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून स्वच्छता मोहीम सुरू

सांगली (प्रतिनिधी)
कृष्णा नदीच्या महापुराचे पाणी ओसरू लागताच सांगलीतील पूरग्रस्त भागांत रोगराईचा धोका टाळण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टने स्वच्छता मोहीम सुरू केली. वखारभाग, म्हसोबा देऊळ परिसर, इदगाह मैदान या भागांत शुक्रवारीपासून मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे काम सुरू केले.
२०१९ आणि २०२१ मधील महापूरात ही मदनी चॅरिटेबल ट्रस्टने अशीच स्वच्छता मोहीम राबविली होती. यंदाही २०२५ मधील महापूरानंतर ट्रस्टचे असंख्य स्वयंसेवक मैदानात उतरले आहेत. पूरानंतर निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे रोगराईचा धोका वाढतो, त्यामुळे तातडीने स्वच्छता करणे अत्यावश्यक असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियांन पठाण यांनी सांगितले. गॅरेज व्यवसायिकांना दिलासा मिळावा म्हणून त्यांच्या परिसरात विशेष लक्ष देण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य ट्रस्टकडून पुरविले जात असून मनपा प्रशासनाच्या सहकार्याने युद्धपातळीवर मोहीम राबविली जात आहे.
हाफिज सद्दाम सय्यद आणि सुफियान पठाण यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांना स्वच्छतेत सहभागाचे आवाहन केले आहे. मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून या मोहिमेसाठी थेट मदत, मार्गदर्शन आणि साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून कोणत्याही समस्येसाठी नागरिकांनी ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.