साळुंखे महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित करण्याचा बहुमान

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी शिवाजी विद्यापीठामार्फत जिल्हास्तरीय, तसेच मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मिरजेत तब्बल ३३ वर्षानंतर शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव होणार आहे. त्याची तयारी येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात सुरू आहे. शनिवारी या महोत्सवाच्या तयारीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या समितीने भेट दिली.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी शिवाजी विद्यापीठामार्फत जिल्हास्तरीय, तसेच मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा शिवाजी विद्यापीठाचा ४५ वा ‘मध्यवर्ती युवा महोत्सव’ आयोजित करण्याचा बहुमान शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयास मिळाला आहे. १८ ते २० सप्टेंबर रोजी हा युवा महोत्सव होणार असून त्यादृष्टीने महाविद्यालयामध्ये तयारी सुरू झाली आहे. आज त्यासंदर्भात महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या ‘युवा महोत्सव समिती’ ने महाविद्यालयाला भेट दिली.
यामध्ये शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. आर. डी. धमकले, डॉ. एस. जी. परुळेकर, डॉ. एम. बी. पोतदार, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, डॉ. आर. एच. अतिग्रे, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. एस. डी. जाधव, डॉ. टी. एम. चौगले, संग्राम भालकर, शंतनु पाटील, मयुरेश पाटील, सुरेखा आडके यांनी भेट देऊन मध्यवर्ती युवा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नोंदणी प्रक्रियेपासून निवासव्यवस्था, भोजन व्यवस्था, स्टेज, लाईट, सादरीकरण, शिस्त, वेळेचे नियोजन, आवश्यक वैद्यकीय सुविधा या बाबत मार्गदर्शन केले. ‘टीमवर्क’ हे युवा महोत्सवाच्या यशाचे खरे गमक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ‘मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन म्हणजे आमच्यासाठी शिवधनुष्य असून, आम्ही हे शिवधनुष्य निश्चितच पेलू आणि हा युवा महोत्सव यशस्वी करून दाखवू’, असे आश्वासन दिले. मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील शिवाजी विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयातील साधारण २००० ते २२०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विविध प्रकारच्या ३६ स्पर्धा होणार आहेत. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अर्जुन जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती हाके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुहास वाघमोडे यांनी आभार मानले.