गोरक्षक प्रकरणी सदाभाऊ, इद्रिस नायकवडी यांनी सुपारी घेतली; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप

0
11

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
आमदार इद्रिस नायकवडी आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर खालच्या पातळीवर टीका केली. राजरोसपणे गायींची कत्तल करणाऱ्यांची सुपारी दोघांनी घेतली असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी येथे केला. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे येथील मारूती चौकातील शिवतीर्थासमोर शुक्रवारी आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी यांनी गोरक्षकांवर केलेल्या टीकेबद्दल जोरदार निदर्शने करण्यात आली. दोन्ही आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.

चौगुले म्हणाले, अनेक ठिकाणी गायींची कत्तल केली जाते. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असतात. तरीही जीवाची बाजी लावून अनेक गोरक्षक गायींची सुटका करून आणतात. या गायींच्या कत्तलीबद्धल सदाभाऊ बोलत नाहीत. अनेक प्रामाणिक गोरक्षक गोवंशाचे रक्षण करतात. मात्र सुपारी घेऊन त्यांच्यावर सदाभाऊ, नायकवडी यांनी आरोप केले आहेत. परंतू यापुढे असे आरोप आम्ही सहन करणार नाही.

ते पुढे म्हणाले, कडकनाथ कोंबडी प्रकरणात घोटाळा करताना सदाभाऊंना शेतकरी आठवले नाहीत. सत्तेत असणारे हे आमदार गोरक्षणाच्या बाबतीत विरोधात भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे गोधन वाचवण्यासाठी तसेच कत्तलखान्याकडे गोधन जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. परंतू यापुढे गोरक्षकांवर आरोप केले तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. काही हप्तेखोर बोगस गोरक्षक सध्या कार्यरत झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू.

यावेळी संघटनेचे अभिमन्यू भोसले, राज पडळकर, विनायक एडके, श्रीकांत माने, बबन सोलणकर, संदीप जाधव, रामभाऊ जाधव, राजू जाधव, पिंटू माने, विक्रांत कोळी, सागर रजपूत, लक्ष्मण मंडले, जयदीप सदामते, दिगंबर साळुंखे, अजिंक्य बोळाज, मोहन शिंदे, प्रशांत जमदार आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *