सर्कस फक्त मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग – प्रकाश माने

सांगलीत न्यू गोल्डन सर्कसच्या व्यवस्थापकांकडून सर्कस पाहण्याचे आवाहन
मिरज प्रतिनिधी (विनायक क्षीरसागर)
सांगली-मिरज रोडवर, भारती विद्यापीठ जवळ न्यू गोल्डन सर्कस मोठ्या प्रतिसादात सुरु आहे. मात्र अजून अपेक्षित प्रतिसाद मिळाला पाहिजे. सर्कस व्यवस्थापन सोपी गोष्ट राहिलेली नाही. जगण्यासाठी आमचीच सर्कस सुरू आहे. सर्कस हि आपल्या संस्कृतीक वारशाचा एक भाग आहे. प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिल्यास हा डोलारा संभाळणे शक्य असल्याचे न्यू गोल्डन सर्कसचे व्यवस्थापक प्रकाश माने म्हणाले.
माने म्हणाले की, “एकेकाळी गावोगावी सर्कशीची धूम असायची. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सर्कशीतला करमणुकीचा आनंद घ्यायचे. पण आता मोबाईल, टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म यामुळे प्रेक्षक सर्कशीकडे फिरकणेच कमी झाले आहे. सर्कशीतील कलाकार दूरदूरच्या राज्यातून येतात. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची तसेच उपकरणे, वाहतूक आणि इतर देखभालीची जबाबदारी प्रचंड मोठी असते. याशिवाय सरकारी कर व परवानग्या यांचा आर्थिक ताणही वाढत चालला आहे. त्यामुळे सर्कशीत जगणे ही आमच्यासाठी अक्षरशः एक वेगळीच ‘सर्कस’ ठरली आहे.
ते पुढे म्हणाले, सर्कस ही फक्त मनोरंजन नसून ती आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. मुलांना, तरुणांना आणि कुटुंबांना एकत्रित आनंदाचा अनुभव देणारे हे माध्यम जिवंत ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी पुढाकार घेऊन सर्कसला जरूर भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सांगलीकरांसाठी न्यू गोल्डन सर्कस सध्या भारती विद्यापीठ जवळ, वॉन्लेसवाडी येथे सुरू आहे. उंच टांगत्या झुल्यांवरील झोके व कसरती, ताणलेल्या उंच दोरावरील वा तारेवरील तोल सांभाळून चालण्याची व अन्य कौशल्याची कामे, जमिनीवरील कोलांटया, कसरतीचे खेळ, हातचलाखीचे प्रयोग, जोकरचे विनोद, बँडवरील वादयसंगीत, चिंपांझी सारखा माणूस हे सर्व सर्कस मध्ये पहायला मिळणार आहे.