कोल्हापूरचा दुचाकी चोरटा मिरजेत गजाआड ; सात दुचाकींसह सव्वा दोन लाखांचा माल जप्त

मिरज (प्रतिनिधी)
शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर येथील अट्टल चोरटा अजय बाळासो पटकारे (वय ४३, रा. विचारे मळा, सदर बाजार, कोल्हापूर) याला गजाआड करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची एकूण किंमत दोन लाख ३० हजार इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांना वरिष्ठांकडून तपास जलदगतीने करून गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेलमधून अलीकडेच सुटलेल्या आणि पूर्वीपासून दुचाकी चोरीत सक्रिय असलेल्या आरोपींची माहिती गोळा केली. त्यातून अजय पटकारे याच्यावर पाळत ठेवण्यात आली. दि. ११ सप्टेंबर रोजी हिरा हॉटेल चौकात तो चोरलेली दुचाकी घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पटकारेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील चौकशीत त्याने मिरज शहर व परिसरातून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अजय पटकारे यापूर्वी तब्बल ३५ दुचाकी चोरल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. चोरीसाठी तो कोल्हापूरहून मिरजेत येऊन विविध भागांत दुचाकी लंपास करत असे. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा व पो.नि. किरण रासकर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.