गांजा विक्री करुन दहशत माजवणारा गुंड हुसेन सय्यद वर्षाकरीता तडीपार ; गांधी चौकी पोलिसांची कारवाई

मिरज (प्रतिनिधी- विनायक क्षीरसागर)
शहरात अवैधरित्या गांजा विक्री करून परिसरात दहशत माजवणारा सराईत गुंड हुसेन बादशाह सय्यद (वय २७, रा. कैकाडी गल्ली, हिंदू धर्मशाळेमागे, मिरज) याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती दिली.
“नशामुक्त भारत अभियान”च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गांजा, गुटखा, पानमसाला यांसारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. हुसेन सय्यदवर गांजाविक्रीसह अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर अनेक वेळा अटक, जामीन, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याने आपली गुन्हेगारी सवय सोडली नाही. उलट जामीनावर सुटताच नवीन गुन्हे करत शहरात दहशत माजवली.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्था.गु.अ. शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तडीपार प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. हुसेन बादशाह सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश त्यांनी दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सोडले.