कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस गाडीचे बुकिंग १६ सप्टेंबर पासून सुरु

मिरज (प्रतिनिधी)
कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01451/52) ही गाडी 24 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. शुक्रवार वगळता दररोज ही गाडी सकाळी ७.५० वाजता मिरज येथून सुटून दुपारी २.३० वाजता सोलापूर आणि संध्याकाळी ४.०० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. गाडीत सहा स्लीपर, चार 3-टीयर एसी आणि सहा जनरल कोच अशी सुविधा असून बुकिंगची सुरुवात १६ सप्टेंबरपासून करता येणार आहे. मिरज ते कुर्डुवाडी दरम्यान सर्व स्थानकांवर या गाडीला थांबा असेल. मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी संस्था कार्याध्यक्ष संदीप शिंदे आणि उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
तसेच माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी व गाणगापूर रोड येथेही थांबा देण्यासाठी प्रस्ताव सोलापूर विभागाकडे पाठवला असून, रेल्वे प्रशासनाकडून त्यास तत्त्वतः मान्यता मिळाल्याचे भोरावत यांनी सांगितले. परतीचा प्रवास करताना कलबुर्गीहून ही गाडी संध्याकाळी ६.१० वाजता सुटेल. सोलापूर येथे रात्री ८.३० वाजता पोहोचून पुढे निघेल व मिरज येथे पहाटे ३.०० वाजता पोहोचेल.