छ.शिवाजी रस्त्याबाबत खासदार विशाल पाटील गप्प का ? मिरज सुधार समिती आक्रमक

मिरज (प्रतिनिधी)
शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते खासदार विशाल पाटील मूग गिळून गप्प का..? असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आली. रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शहरी बस स्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटविणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणसाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक (डीवायडर) आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षंभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, जिल्हाधिकारी माझे ऐकत नसल्याचे बेजबाबदार वक्तव्ये करतात. या रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडित असल्याने याची जबाबदारी खासदारांची आहे. खासदार मिरजकरांना दिलेला शब्द फिरवत असतील तर.. मिरज सुधार समिती खासदारांना जाब विचारल्या शिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी दिला आहे. यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, श्रीकांत महाजन, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, दिनेश तामगावे, सलीम खतीब, अभिजीत दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते.