संस्कार भारती मिरज महानगरच्यावतीने आयोजित सुमेधाताई चिथडे यांचे व्याख्यान उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
संस्कार भारती मिरज महानगर समिती व आनंद आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ सिर्फ’ (Soldiers Independence Rehabilitation Foundation) या संस्थेच्या संस्थापिका व सियाचीन कुपवाडा, तवांग अशा बर्फाळ दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभ्या करणाऱ्या सेवाव्रती सुमेधाताई चिथडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात ध्येयगीताने झाली तर नंतर सुमेधाताई चिथडे, वैद्य सुमेधा रानडे व संस्कार भारती मिरज समितीचे अध्यक्ष श्रीधर देसाई यांच्या हस्ते भारतमाता पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
समिती अध्यक्ष श्रीधर देसाई यांच्या हस्ते सुमेधाताईंचा सत्कार करण्यात आला. समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले गुरु व जीवनादर्श मानणाऱ्या सुमेधाताईंनी आपले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, वायुदलात असणारे त्यांचे पती योगेश चितळे यांच्या सहकाऱ्यांनी सैनिक व त्यांचा परिवार यांच्या कल्याणासाठी व दिव्यांग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी ‘सिर्फ’ या संस्थेची स्थापना केली. वीरमरण आलेल्या सैनिकांच्या वीर पत्नींना दत्तक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य केले.
आपल्या देशाच्या सीमांची रक्षा करताना आपला सैनिक दीर्घकाळापर्यंत दुर्गम अशा बर्फाळ प्रदेशात राहतो, त्या अतिउंचीच्या प्रदेशात ऑक्सिजनची कमतरता असल्याने सैनिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते हे लक्षात घेऊन त्यांनी अशा दुर्गम भागात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे ठरवले. त्यासाठी अक्षरशः झोळी घेऊन पावन भिक्षा मागून बारा कोटी रुपये या कार्यासाठी उभे केले व सियाचीन, कुपवाडा, तवांग यासारख्या विरळ ऑक्सिजन असणाऱ्या बर्फाळ प्रदेशात ऑक्सिजन प्लांट उभे केले.
यासाठी आपल्या भारतीय जनतेने मोलाचे सहकार्य केले हे त्यांनी आवर्जून नमूद केले. मी केलेले कार्य हे माझ्या गुरूंनी माझ्याकडून करून घेतले असे त्या विनम्रपणे म्हणाल्या. याचबरोबर आपली भारतीय संस्कृती हा आपला अमूल्य ठेवा आहे, त्याची जपणूक केली पाहिजे, असेही विचार त्यांनी मांडले. संस्कृतीची जाण, निस्वार्थी सेवावृत्ती व लीनता या गुणांनी विभूषित असलेल्या सुमेधाताईंनी सर्व प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वैद्य सुमेधा रानडे व संस्कार भारती पश्चिम प्रांत मातृशक्ती संयोजिका राजश्री शिखरे यांनी केले.