राजकीय द्वेष व सूडबुद्धीने हारगे व कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा -सौ. हारगे

मिरज प्रतिनिधी
मनपा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे निव्वळ राजकीय द्वेषापोटी व प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने अभिजीत हारगे व आकाश कांबळे यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा खुलासा माजी नगरसेविका सौ. संगीता अभिजीत हारगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्या म्हणाल्या, महापालिकेच्या प्रभाग क्र. २० मधून अभिजीत हारगे व आकाश कांबळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रभागातील त्यांची वाढती लोकप्रियता व निव्वळ राजकीय द्वेषपोटी आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा मलिन व्हावी व त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पीडित महिलेवर दबाव टाकून आणि राजकीय बळाचा वापर करून अभिजीत हारगे व आकाश कांबळे यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा खुलासा ही माजी नगरसेविका सौ. संगीता हारगे यांनी यावेळी केला.
त्या पुढे म्हणाल्या पिडीतेला हाताशी धरून तिच्यावर दबाव टाकून आणि राजकीय बळाचा वापर करून राजकीय द्वेषापोटी तिला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. यापूर्वीही असले घाणेरडे प्रकार सदर व्यक्तीने केले आहेत. राजकीय भवितव्य कोठेतरी संपत आल्याचे लक्षात आल्याने काही व्यक्ती जाणूनबुजून असले प्रकार घडवून आणीत असल्याने पुढील काळात असले प्रकार खपवून घेणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी अभिजीत हारगे व आकाश कांबळे यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करावयास लावणाऱ्या पडद्यामागच्या मास्टरमाइंडचा बुरखा लवकरच पुराव्यासह आणि नावानिशी फाडणार असल्याचे सांगितले. राजकारण करताना वैचारिक मतभेद जरूर असावेत परंतु कुटुंबावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रकार निषेधार्ह असून असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर लवकरच पुराव्यासह आणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.